नंदुरबार | प्रतिनिधी
शहरातील यशोधन पार्कमध्ये घरफोडी होवून ४९ हजाराचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील कोकणीहील परिसरातील यशोधन पार्कमधील प्लॉट क्र.३२ वर राहणारे वासुदेव दगडु पटेल हे आई वडीलांच्या औषधोपचारासाठी शहादा येथे गेले होते. चोरटयांनी घर बंद असल्याची संधी साधत घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले १२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे झुमके, १२ हजार रूपये किंमतीचे दोन सोन्याच्या अंगठया, पाच हजार रूपये किंमतीचे हाताचे चांदीचे कडे, पैंजण,तसेच २० हजार रूपये रोख असा एकूण ४९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. वासुदेव पाटील हे नवापूर तालुक्यातील आमलाण अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत आहेत. वासुदेव पटेल यांच्या घराशेजारी राहणारे सर्जेराव पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवर फोन करून तुमच्या घराचे लॉक तुटलयाचे सांगितले. परत आल्यावर त्यांनी पाहिले असता घराचा सामान अस्ताव्यस्त फेकला होता. तसेच कपाटातून मुद्देमाल लंपास करण्यात आला. वासुदेव पटेल यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.