नंदुरबार l प्रतिनिधी
नुकसानग्रस्त शेतीची पिक पाहणी आता शेतकऱ्यांना स्वतः करता येणार असून एका विशिष्ट ॲपबाबतची नोंदणी करून शेतकऱ्यांना शासनाकडे माहिती पाठवता येणार आहे .याबाबत नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतकरी यांना स्वतः आपल्या फोन ने आपली पीक पाहणी अपलोड करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती महसूल प्रशासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात आली आहे . यानुसार शेतकऱ्यांना आता स्वतःच्या पिक पाहणीची नोंद करता येणार आहे . याकरिता ई – पीक पाहणी नावाचे एक ॲप विकसित केले असुन ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे . हे अतिशय सोपे ॲप आहे.यावर आपली माहिती भरून नोंदणी केल्यावर एक संकेतांक प्राप्त होईल.त्यानंतर आपल्या शेतावर जाऊन पिकांच्या फोटोसह क्षेत्र , पिकाचे
नाव , सिंचन पद्धती आदी माहिती भरावयाची आहे . एका नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून २० खातेदारांची पिक पाहणी नोंदवता येईल . त्यामुळे स्मार्ट फोन नसल्यास चिंतेचे कारण नाही . कुठलीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील स्थानिक तलाठी , कृषी सहाय्यक , कोतवाल यांच्याशी संपर्क साधायचा
आहे . खरीप हंगामाची मुदत दि .१५ सप्टेंबरपर्यंत असली तरी दि .३१ ऑगस्ट पर्यंत आपली पीक पाहणी नोंदवावी.या माहितीचा उपयोग पीक विमा , नुकसान झाल्यास अनुदान वाटप अशा विविध शासकीय योजनांकरिता होणार आहे. याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी उमर्दे खुर्द ग्रामपंचायत व तलाठी यांनी संयुक्त पद्धतीने शेतकरी बांधवांना ई. पीक पाहणी ॲपद्वारे स्वतः आपल्या फोन ने आपली पीक पाहणी अपलोड कशी करायची आहे. प्रशिक्षण देण्यात आले.प्रत्यक्ष शेतात तसेच गावातील विविध भागात शेतकऱ्यांना तलाठी के. डी.सुर्यवंशी यांनी प्रशिक्षण दिले.यावेळी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंके, पोलीस पाटील दिलीप चौधरी,योगेश कदमबांडे रविंद्र साळवे, खंडू कदमबांडे, मयूर बेंद्रे शेतकरी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.