नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात गणरायाचे ढोलताशांच्या गजरात, गुलालची उधळण करत जल्लोषात आगमन झाले. दोन वर्षानंतर प्रथमच मोठया प्रमाणावर जल्लोष करण्यात आल्याने उत्सव साजरा करत असल्याचा आनंद नागरिकांच्या चेहर्यावर दिसून आला.
यंदा शासनाने सर्व निर्बंध हटविले आहेत. परिणामी सण उत्सव जोमात साजरे होत आहे. दोन वर्षांनी प्रथमच मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. गेल्या आठवडभरापासून जिल्हाभरातील गणेश मंडळांसह अनेक बालगोपाल घरगुती तसेच मंडळाच्या गणरायाच्या आगमनाच्या तयारीला लागले होते.

यंदा गणपतींच्या मुर्त्या काही प्रमाणात महाग असल्या तरीही भाविकांनी त्या खरेदी केली. दोन दिवसांपासून गणपती मुर्त्यांच्या खरेदीसाठी लगबग दिसून येत होती. खेडयापाडयातील नागरिकांनी ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो, रिक्षा, बैलगाडयांवर शहरी भागात येवून गणरायांच्या मुर्ती खरेदी केल्या व ढोलताशांच्या गजरात स्थापनेसाठी नेल्या.
बालगोपालांनी हातलॉरी, मोटरसायकल, तसेच हातात धरुन गणरायाला घरी आणले. काही मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत मिरवणुकीने गणरायाची स्थापना केली.
जिल्हयात ८९८ मंडळांची स्थापना
जिल्हयात यावर्षी ८९८ गणेश मंडळांकडून श्रींची स्थापना करण्यात येणार आहे. यात ३४६ खाजगी गणपती तर २७८ सार्वजनिक गणपती आहे. ११० गावांमध्ये एक गांव गणपती संकल्पना राबविण्यात येत आहे.
मानाच्या दादा व बाबा गणपतीची स्थापना
नंदुरबार शहरातील प्रथम मानाचा श्री दादा गणपती व श्री. बाबा गणपतींचीही जल्लोषात स्थापना करण्यात आली. दोन्ही मानाच्या गणपतींना शेकडो वर्षांची परंपरा आहे. या गणपतींची विशेषतः म्हणजे, दोन्ही गणपतींची मुर्ती काळया मातीने ज्याठिकाणी स्थापना करण्यात येते, त्याच रथावर तयार करण्यात येते. यासाठी महिनाभराआधीच तयारी केली जाते. शेवटच्या दोन दिवसात त्यांच्यावर रंगरंगोटी करुन अखेरचा हात फिरविला जातो. एकुणच गणरायाच्या आगमनामुळे जिल्हाभरात उत्साह व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.









