नंदुरबार ।
तालुक्यातील रजाळे येथील ठेलारी-आदिवासी वसाहतीत घरासमोरील असलेल्या विजेच्या खांबाची दुरवस्था झाल्यामुळे येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा विजेचा खांब खालच्या बाजूनी पूर्णपणे गंजून गेल्याने तो 22 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास वीज प्रवाह सुरू असताना अचानक पडला.
सुदैवाने यावेळी कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र वारंवार जीर्ण विद्युत तारा व खांब तुटून पडत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्युत वितरण कंपनीचा आडमुठेपणामुळे गावात असे चित्र दिसून येत आहे. संबंधित विद्युत वितरण विभागाने लक्ष घालावे अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमध्ये होऊ लागल्या आहे.
गावामध्ये अनेक ठिकाणी विद्युत खांब, तारा जीर्ण झाल्या आहेत. तसेच काही दिवसापूर्वी या वस्तीमध्ये विद्युत केबल टाकण्यात आली मात्र पोल जैसे थे असल्याने ही घटना घडली आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. महावितरण वीज बिल जर सक्तीने वसुली करीत असेल तर ग्राहकांना सहकार्य करणे हे वीज मंडळाचे नैतिक कर्तव्य आहे.
मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. या ठिकाणी घरे तसेच लहान मुले खेळण्यासाठी येत असतात, अशा वेळी अपघातांची समस्या नाकारता येत नाही. तसेच पावसाळा सुरू असून यामुळे विजेच्या शॉक लागण्याची शक्यता असते. अशावेळी वीज मंडळ अधिकारी यांनी लक्ष घालून या ठिकाणी नवीन खांब बसवावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
तसेच ठेलारी वस्तीत जीर्ण झालेला विद्युत खांब दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा अशी मागणी येथील सावळीराम शिवाजी करिया , धनराज सखाराम भील, देविदास सखाराम भील, कृष्णा मरिबा ठेलारी , भिवा मरीबा ठेलारी , बायजाबाई शिवा ठेलारी, हंबर शिवा ठेलारी, कंगा भिवा ठेलारी या रहिवाशांनी केली आहे. घटना घडताच ग्रामपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विद्युत वितरणला या घटनेची माहिती देण्यात आली.








