नंदुरबार | प्रतिनिधी
तालुक्यातील वाघशेपा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या स्मशानभुमीत शिवण नदीच्या पुराचे पाणी शिरुन पुरलेले दोन ते तीन मृतदेह वाहुन गेल्याची भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हयात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. विरचक्क धरणातुन शिवण नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. यामुळे शिवण नदीलाही पूर आला आहे. वाघशेपा गावाची स्मशानभुमी ही या नदीच्या किनार्याला लागुन आहे.
याठिकाणी १४ ऑगस्ट रोजी पाणी शिरल्याने पाण्याच्या या प्रवाहात पुरलेले अनेक मृतदेह बाहेर आले असुन यातील दोन ते तीन मृतदेह वाहुन गेल्याचा दावा ग्रामस्थांकडुन करण्यात आला आहे. याबाबत प्रशासनाने देखील पडताळणीसाठी आपले पथक घटनास्थळी पाठवल्याचे समजते.








