नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा ते दलेलपूर रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ३० वर्षीय तरुण ठार तर त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोेदा तालुक्यातील रानमहू येथील सुनिल कृष्णा वसावे हा त्याचा साथीदार टेकल्या पाचा पावरा रा.धवळीविहिर ता.तळोदा यास दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एस ६३७६) तळोदाहून ते दलेलपूरकडे जात होते. यावेळी एका विना नंबर असलेले लाल रंगाच्या ट्रॅक्टरवरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात सुनिल वसावे हा तरुण ठार झाला तर त्याचा साथीदार टेकल्या पावरा यांना दुखापत झाली. याबाबत कृष्णा भामटा वसावे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.