नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा अथलेटिक्स संघटनेतर्फे ३१ जुलै रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र अथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेसाठी या निवड चाचणीतून नंदुरबार जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी (३१ जुलै) सकाळी आठ वाजता निवड चाचणीला सुरवात होईल. ही निवड चाचणी स्पर्धा १४, १६, १८ व २० वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात होणार आहे.
१४ वयोगटात सहभागी होणार्या स्पर्धकाचा जन्म हा १५ नोव्हेंबर २००८ ते १६ नोव्हेंबर २०१० या कालावधीतील असावा,
१६ वर्षांखालील गटात सहभागी होणार्या खेळाडूंचा जन्म तारीख १५ नोव्हेंबर २००६ ते १६ नोव्हेंबर २००८ या मधील असावी. १८ वयोगटात सहभागी होणार्या खेळाडूची जन्म तारीख १५ नोव्हेंबर २००४ ते १६ नोव्हेंबर २००६ या मधील असणे आवश्यक आहे. २० वर्षांखालील गटात सहभाग घेणार्या खेळाडूचा जन्म हा १५ नोव्हेंबर २००२ ते १६ नोव्हेंबर २००४ यामधील असणे गरजेचे आहे.
निवड चाचणी स्पर्धा ही धावणे, उड्या, फेकणे, रिले अशा विविध प्रकारांत घेण्यात येणार आहे. या सर्व प्रकारांत जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी ५० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आलेले आहे.
या शिवाय ज्या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड होईल अशा खेळाडूंना राज्य संघटनेच्या नियमाप्रमाणे नोंदणी व प्रवेश शुल्क भरावी लागणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा तांत्रिक प्रमुख प्रा.डॉ.मयुर ठाकरे (९७६७६७७०५६), क्रीडा शिक्षक जगदिश वंजारी (९७६३६५६६३९) तसेच चेतन शेवाळे (९८२२९३९१९७ )यांच्याशी संपर्क साधावा,
विजेत्या खेळाडूंची राज्य संघटनेच्या पात्रता निकषानुसार राज्य स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे. उस्मानाबाद, अमरावती व मुंबई उपनगर येथे राज्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत निवड केलेला संघ यात सहभागी होईल, अशी माहिती सहसचिव प्रा.डॉ.मयुर ठाकरे यांनी दिली.