नंदुरबार l प्रतिनिधी
जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील शिवण मध्यम प्रकल्पात अल्प पाणीसाठा असल्याने नंदुरबारकर नागरिकांना २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने प्रकल्पात ८२ टक्के पाणीसाठा असल्यामुळे आता पुन्हा १ ऑगस्टपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदूरबार पालिकेने घेतला आहे.
मागील वर्षी नंदुरबार शहर व परिसरात दमदार पाऊस बरसला नव्हता. हिवाळ्यात नागरिक पाण्याच्या वापर कमी करत असल्याने २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. शहरातील नागरिकांना रणरणत्या उन्हाळ्यात पाण्याची गरज लक्षात घेता नगराध्यक्ष , उपनगराध्यक्, पाणीपुरवठा सभापती , मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी नियोजन करीत पुन्हा ‘जैसे थे’ एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता.
जून महिन्यात पाऊस लांबल्याने पुन्हा विरचक धरणातील पाण्याची पातळी खालावत चालली होती. मृतसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने २ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे निर्णय पालिकेने घेतला. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सर्व परिसरात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणी कपातीचे संकट दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा होती. सतत दमदार बरसणाऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील शिवण मध्यम प्रकल्पात पाणी साठ्याची वाढ झाल्याने पाण्याचे टेन्शन मिटले.
सध्या प्रकल्पातील पाण्याची पातळी २३७.८५ मिटर असून,८२ टक्के दलघमी पाणीसाठा असल्यामुळे मुबलक प्रमाणात नागरिकांना पाणी वापरता येणार आहे. मागील वर्षी याचवेळी ४२ टक्के पाणी साठा होता. गतवर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी पाण्याची वाढ झाली असल्याने शहरातील नागरिकांवरील ‘पाणीबाणी’चे संकट मिटले आहे.