नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शहाणा येथे घरगुती कारणावरुन पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील शहाणा येथील रेलसिंग जयसिंग भंडारी व त्यांची पत्नी सुमनबाई रेलसिंग भंडारी यांच्यात घरगुती कारणावरुन वाद झाला.
या वादातून रेलसिंग भंडारी याने रागाच्या भरात सुमनबाई भंडारी यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाड मारुन गंभीर दुखापत केली. सुमनबाई भंडारी यांना पानसेमल येथील सरकारी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता औषधोपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत प्यारेलाल रेलसिंग भंडारी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात रेलसिंग भंडारी याच्याविरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.








