नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील ४५० नागरीकांना बँकेतून मुद्रा लोन मंजूर करून देते असे आमिष दाखवून ५ लाख ५८ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार येथील एका महिलेविरूध्द विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील सोनल तांबोळी उर्फ वंदना बारी हिने स्वतःचा आर्थिक फायदा करीता कविता चुडामण चौधरी व इतर नागरीकांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी बँकेतून मुद्रालोन मंजूर करून देते असे खोटे आश्वासन देवून
कविता चौधरी व खांडबारा गावातील ४५० गरजू पुरूष महिला यांच्याकडून प्रतिव्यक्ती १३०० रूपये प्रमाणे एकूण ५ लाख ५८ हजार रूपये रोख घेवून त्या रक्कमेचा अपहार करून फसवणूक केली.
तसेच कविता चौधरी यांनी पैसे परत मागितले असता. संशयीत आरोपी यांनी त्यांच्या पतीस तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि पुन्हा पैसे घ्यायला नंदुरबार येथे आले तर विनयभंगाच्या खोटया केसमध्ये अडकवून देईल. अशी धमकी दिली म्हणून
कविता चुडामण चौधरी रा.शिवाजीचौक (खांडबारा ता.नवापूर) यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात सोनल तांबोळी उर्फ वंदना बारी (रा.नंदुरबार) हिच्या विरूध्द भादंवि कलम ४०६, ४२०, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास असई तुकाराम चौरे करीत आहेत.








