नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सकाळी अतिशय उत्साही वातावरणात डी. आर. हायस्कूल पासून विठ्ठल मंदिरापर्यंत विठ्ठल रुक्माईची वारी काढली. यावेळेस ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा, रिंगण, विद्यार्थी व शिक्षकांच्या फुगड्या अशा विविध कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय व आनंददायी झाला.
विठ्ठलाच्या वेशभूषेत मयूर गवते, रुक्माईच्या वेशभूषेत प्रथम अहिरे, वासुदेवाच्या वेशभूषेत तेजस वाडेकर, संत तुकाराम यांच्या वेशभूषेत आर्या वसईकर, संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत गणेश पाटील, तसेच वारकरी वेशभूषेमध्ये वैभव गावित, श्रीदत्त पाटील, दर्शन बंजारा, स्मित सौंदाणकर, हर्षित कापसे, कीर्तीकुमार लोहार व अनेक उत्साही मुलांनी सहभाग नोंदविला.
सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक विपुल दिवाण आदी मान्यवरांच्या हस्ते पालखी व ज्ञानेश्वरी चे विधिवत पूजन करून वारीला सुरुवात झाली.
परिसरातील नागरिकांनी या चिमुकल्या बालकांच्या वेशभूषेचे कौतुक करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. तदनंतर विठ्ठल मंदिरात वारी पोहोचल्यानंतर सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व वेशभूषेतील सर्व पात्र यांनी विठ्ठल मंदिरात विठ्ठलाची आरती केली व वारीदरम्यान शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी फुगड्या व नृत्य सादर करून संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले व वारीतील विद्यार्थी यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करून संपूर्ण परिसर भक्तीमय व आनंदमय केला.
शाळेत वारी परत आल्यानंतर शाळेच्या मैदानात रिंगण तयार करून विठ्ठलाच्या भावगीतावर विद्यार्थी व शिक्षक यांनी लय धरली. विठ्ठलाची आरती झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी, योगेश गवते, निलेश गावित, दिनेश वाडेकर, जगदीश बच्छाव, राजेंद्र लांडगे, घनश्याम लांबोळे, दिलीप पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.








