नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मोकाट, पिसाळलेले कुत्रे, डूकरांसह गुरा-ढोरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी केली आहे. तसे निवेदन नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना देण्यात आले. मागणीचा विचार न झाल्यास शहरातील सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत सोडण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदना पुढे म्हटले आहे की, नंदुरबार शहरात मोकाट व पिसाळलेले कुत्रे तसेच डूकरांची वर्दळ वाढलेली आहे. सदर मोकाट कुत्रे व डूकर ही रात्री-बेरात्री ये-जा करणार्या नागरिकांवर हल्ला करतात. यामुळे मोकाट कुत्रे, डूकरे, मोकाट गुरे यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. शहरातील माणिक चौक, नेहरु पुतळा, हाटदरवाजा, मुख्य बाजार, अमृत चौक, मंगळ बाजार, माळीवाडा, बागवान गल्ली, शहीद टिपु सुलतान चौक, शादुल्ला नगर, गाझी नगर, राजीव गांधी नगर, सोनाबाई नगर आदी परिसरात या मोकाट गुरेढोरांमुळे नागरीक हैराण झाले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चावामुळे बालकांचा जीव देखील गेला आहे. तसेच मोकाट गुरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवून वाहतुकही ठप्प करतात. अनेकवेळा लहान-मोठ्या स्वरुपाचे अपघात झाल्याच्या नगरपालिकेत तक्रारी केलेल्या आहेत.शहरातील विविध भागात पिसाळलेल्या कुत्रांचा व डूकरांचा फारच त्रास वाढला आहे. मोकाट कुत्रे रोज अनेकांना चावा घेतात, लोकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनात अचानकपणे घुसुन अपघात होवून अनेक अपघात झालेले आहेत. तरी आमच्या मागणीचा विचार न झाल्यास शहरातील सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत सोडण्यात येतील, असा इशाराही नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी दिला आहे. निवेदन देतेप्रसंगी आसिफ बागवान, वाजिद बागवान, डॉ.हेमंत चौधरी, पंडीत चौधरी, जाकीर शाह, रिजवान खान आदी उपस्थित होते.