नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात मद्यपी वाहन चालकाविरुध्द् पोलीसांनी धडक मोहीम राबवित ५५२ वाहन चालकांची तपासणी करुन ५९ गुन्हे दाखल केले आहे.यापुढे ही अशी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगीतले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . बी . जी . शेखर पाटील यांनी रस्ते अपघाताच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता बरेचशे गुन्हे हे वाहन चालकाच्या चुकीमुळे विशेषतः मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यामुळे झाले असल्याचे आढळून आले .
त्यामुळे संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणार्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांना आदेश दिले होते . त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणार्या वाहन चालकांविरुध्द दि.१८ जून रोजी रात्री ८ ते रात्री ११ वाजे दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते .
या विशेष मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत एकुण २० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती . नाकाबंदी दरम्यान एकुण ५५२ चारचाकी व दुचाकी मोटरसायकल चालकांची तपासणी केली असता , त्यात ५९ वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळून आले .
त्यामुळे त्यांच्या विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे – १० , उपनगर पोलीस ठाणे येथे – ४ , नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे – ४ , नवापुर पोलीस ठाणे येथे – ११ , विसरवाडी पोलीस ठाणे येथे – ६ , शहादा पोलीस ठाणे येथे- ४ , धडगांव पोलीस ठाणे येथे ३ , म्हसावद , सारंगखेडा , अक्कलकुवा , तळोदा पोलीस ठाणे येथे प्रत्येकी २ गुन्हे , मोलगी पोलीस ठाणे येथे ३ , शहर वाहतुक शाखेमार्फत ६ गुन्हे असे एकुण ५९ गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले .
या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने ( लायसन्स ) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात येणार असून लवकरच त्यांच्यावर परवाने ( लायसन्स ) निलंबनाची कारवाई करण्यात येईल व भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे .
नाकाबंदीसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , शहादा श्रीकांत घुमरे , उप विभागीय पोलीस अधिकारी , अक्कलकुवा संभाजी सावंत , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व १५ दुय्यम अधिकारी तसेच १०७ पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेतला .
दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे . नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे . तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये . दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करून परवाने ( लायसन्स ) निलंबित करण्याबाबतची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .








