म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील नागझिरी येथून शुक्रवारी दुपारी लग्न समारंभ आटोपून तोरणमाळ येथे परत जाताना पिकअप गाडी कोटबांधणी गावाजवळ पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहे.याबाबत म्हसावद पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार असे की, मनोज मोमदा नाईक रा.तोरणमाळ यांनी फिर्याद दिल्यानुसार नागझिरी,ता.शहादा येथील लग्न समारंभ आटोपून तोरणमाळ येथे परत जाताना पीक अप गाडी (क्रमांक एम.एच.39,ए.डी. 1629) हिच्यात वरील प्रवासी बसवुन तोरणमाळ येथे चालवुन जात असताना
चालक नवलसिंग गाज-या नाईक रा.भौतीपाडा,तोरणमाळ याने हयगयीने भरधाव वेगाने गाडी चालवल्याने रोडचे बाजुला पलटी झाली त्यात दिपक दिला चौधरी(26)हा गाडीखाली दाबला जावून जागीच ठार झाला.
तर पृथ्वीराज लेहरसिंग चौधरी(14), गोरख बिसन नाईक(17), गेमीबाई रेवज्या नाईक (13) हे जखमी झाले. त्यांना म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला याबाबत म्हसावद पोलीसात भादंवी कलम 304(अ),279,337,427 अन्वये गुन्हा दाखल करून पो.काॅ. जितेद्र चपालाल पाडवी, हवालदार राजेद्र निलकंट चव्हाण तपास करीत आहेत.