नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील कामनाथ महादेव मंदिराच्या मागे असलेल्या म्हशींच्या तबेल्यात गाईंनी चारा व धान खाल्ल्याच्या कारणावरुन एकास फावडीच्या दांड्याने व दुसऱ्यास कुऱ्हाडीने डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील ईश्वर आण्णा गवळी यांच्या मालकीच्या नंदुरबार शहरातील कामनाथ महादेव मंदिराच्या मागे असलेल्या म्हशींच्या तबेल्यात त्यांचे दैनंदिन कामकाज करीत होते.
यावेळी मेहूल मक्का भरवाड हा तबेल्याजवळ गाई चारत होता. सदर गाईंनी म्हशींच्या तबेल्यात शिरुन धान व चारा खात होत्या. यावर ईश्वर गवळी यांनी मेहूल भरवाड याला जाब विचारला. याचा राग आल्याने मेहूल भरवाड याने १५ ते २० इसम घेवून आला.
त्यापैकी प्रतिक आलाभाई भरवाड याने ईश्वर गवळी यांना पकडून ठेवत मेहूल भरवाड याने फावडीच्या दांड्याने डोक्यावर मारुन दुखापत केली. यावेळी साक्षीदार संजय आण्णा गवळी हे भांडण सोडविण्यासाठी आले असतांना त्यांनाही मयूर मक्का भरवाड याने कुऱ्हाडीने कपाळावर मारुन दुखापत केली.
तसेच मेहेर चंदू गोंधळी, प्रविण भरवाड, निलेश भरवाड, विष्णू भरवाड यांच्यासह १५ ते २० जणांनी दांड्याने व हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत ईश्वर गवळी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात २० जणांविरोधात भादंवि कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कमल ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माळी करीत आहेत.