नंदुरबार ! प्रतिनिधी
दोंडाईचा – शिंदखेडा रस्त्यावर हॉटेल शिवालयाच्या जवळ भाजीपाला घेऊन जाणारी व पिकअप उज्जैनहून देवदर्शन करून येणाऱ्या गुजरात राज्यातील भाविकांच्या कारचा सोमवारी पहाटे पाच वाजता भीषण अपघात झाला.या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला . त्यात एक भाविक तर दुसरा पिकअपचा चालक आहे . अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात , तिघांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात तर एकाला दोंडाईचा येथे दाखल केले आहे . घटनास्थळी रुग्णवाहिका तासभर विलंबाने आल्याने जखमींना अखेर मालवाहू वाहनाने हलवावे लागले .
याबाबत अधिक माहिती अशी की, दोंडाईचा-शिंदखेडा रस्त्याव दि ९ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारे पिकप व ईको वाहनाचा भीषण अपघात झाला. दोंडाईचा कडून शिंदखेडाकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकप वाहन क्रमांक एम.एच.१८ ए.ए.५७६५ आणि शिंदखेडाकडून दोंडाईचा दिशेने जाणारी जी.जे ०५,आर.ई ९४९७ क्रमांकाची ईको कार जात असताना बाम्हणे शिवारात शिवालय हॉटेल जवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ईको गाडीतील अनिकेत विश्वास पटेल (३४) हा ईसम जागीच ठार झाला तर पिकप वाहन चालक हाजीईकबाल हाजीहुसेनउद्दीन पिंजारी (वय ३६) रा. गौसिया नगर दोंडाईचा यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे घेऊन जाताना रस्त्यावर मृत्यु झाला, तर कृष्णा मोहनलाल जाट, मोनु वीरेंद्र सैनी, आशिष समाभाई यादव, सागर बलंतूसिंग जाट, अभिषेक अवधेभाई पटेल व अर्जुन पटेल हे सर्व गुजरात राज्यातील सुरत येथील असल्याचे माहिती मिळाले आहेत सदर सहा जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींना दोंडाईचा येथुन धुळे व नंदुरबार येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, घटनेची माहिती मिळताच दोंडाईचा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास पाटील, चंद्रकांत साळुंखे, संजय गुजराथी, आण्णा माळी हे दाखल झाले व जखमींना उपचारासाठी रवाना केले. मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील विको वाहनातील इसम हे मध्यप्रदेश राज्यात असलेले उज्जैन महाकाल येथील दर्शन घेऊन घरी परतत असताना हा काळाने घाला घातला.
रुग्णवाहिका एक तासाने उशिरा-
अपघात झाल्यानंतर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहीकेला संपर्क साधण्यात आला होता. मात्र तब्बल 1 तास उशीराने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती. यामुळे अपघातग्रस्तांना एकतास घटनास्थळी तात्कळत रहावे लागले. यामुळे उपस्थित नागरिकांनींकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिका ही नेहमीच उशिरानेच पोहचत असते यात उपचार वेळेवर न मिळाल्याने अनेकांचे प्राण जात असतात. संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि रुग्णवाहिका कार्यान्वित करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.