तळोदा | वार्ताहर
तळोदा तालुक्यातील मालदा येथे विश्व आदिवासी गौरव दिनाच्या निमित्ताने गावातील आदिवासी महिला शेतकरी गटांच्या पुढाकारातून आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात आला.
मालदा येथे लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून वनपट्टे धारक आदिवासी महिला शेतकऱ्यांचे गट स्थापन करून समृद्ध शेती समृद्ध जीवन हा प्रकल्प राबविला जातो. या गटातील महिलांनी एकत्र येत देवमोगरा माता व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करून पारंपारिक ढोल नृत्य करून जल्लोषात आदिवासी गौरव दिन साजरा केला.
यावेळी गावातील कणीमाता महिला शेतकरी गट, राणी काजल महिला शेतकरी गट, सातपुडा महिला शेतकरी गट या गटांमधील महिलांनी पुढाकार घेतला. तसेच गावातील दिगंबर खर्डे, हिम्मत पवार, हरिष पावरा, वसंत पवार, दत्तू खर्डे, सविता ठाकरे यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी लोकसमन्वयचे स्मिता देशमुख व संजय महाजन हे उपस्थित होते.