नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील गोरंबा ग्रामपंचायत मधील लहान गावठाण पाडा, मोठे गावठाणपाडा, मोवडाबीपाडात राहणाऱ्या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या परिसरात जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना नैसर्गिक झऱ्यावर अवलंबून राहावे लागते.
जवळपास तीन हजार पेक्षा अधिक नागरिक असलेल्या या पाड्यांवर मे महिन्याच्या अखेरीस देखील प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नसून नागरिकांना डोंगरदऱ्यात असलेल्या नैसर्गिक झऱ्यातून आपली तहान भागवण्यासाठी दीड ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
मे महिन्याच्या अखेरीस नैसर्गिक झरे आटत आली असल्याने गढूळ दूषित पाणी पिऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे.
गोरंबा गावात गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नळपाणी योजना आखण्यात आली मात्र कागदावरच राहिली.
हातपंपाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र योग्य ठिकाणी नसल्याने पाण्याअभावी आटले आहे. जवळपासचे नदी, नाले, विहिरी सर्व कोरड्या पडल्या असून गोरंबा ग्रामपंचायत मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
ग्रामपंचायत मधील सरपंच, सदस्य तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने गोरंबा ग्रामपंचायत मधील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी सुरेश राहसे, दिलीप तडवी,दीना वळवी यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.