तळोदा | प्रतिनिधी
चिनोदासह परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावून चांगलाच दिलासा दिला आहे. तब्बल पंधरा ते वीस दिवस वरूणराजाने हुलकावणी दिल्याने पाऊस लांबणीवर पडतो की काय? त्यामुळे पेरणीसह कापूस लागवड सुध्दा लांबणीवर पडली होती अशा विवंचनेत शेतकरी सापडला होता. असे असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावून दिलासा दिला.
चिनोदासह परिसरात पावसाचे आगमन झाल्यामुळे उकाडयामुळे हैराण झालेल्या नागरिकांना देखील वातावरणातील गारव्यामुळे दिलासा देत शेतकर्यांच्या खोळंबलेल्या पेरण्यासह कापूस लागवडीला वेग येणार आहे.
शेतकर्यांनी शेतीच्या सर्व मशागतीची कामे आटोपल्यामुळे शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या होत्या. मात्र वरूणराजाने उशिरापर्यत हजेरी लावली नाही. चिनोदा परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन दि.२१ जून रोजी सायंकाळी ६ वाजेला चिनोदा परिसरात पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या.
पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांना या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला असून सोयाबीन, तूर, मका आदी पिकांच्या खोळंबलेल्या पेरणीसह कापूस लागवडीलाही वेग येणार आहे. पहिल्या पावसाला प्रारंभ झाल्यामुळे शेतकरी आनंदीत झाल्याचे चित्र चिनोदासह परिसरातून दिसूत येत आहे.