तळोदा l प्रतिनिधी
मोरवड,धानोरा ,तळवे, दसवड परिसरातील शेतकऱ्यांनी वरीष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तळोदा यांना नियमित खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्या बाबत निवेदन सादर करण्यात आले आहे.
यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांनी म्हटले आहे की,गेल्या पंधरा दिवसापासून सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके ही पाण्याअभावी करपू लागली आहेत.नियमित वीज उपलब्ध होत नसल्याने पिकांना पाण्याचा पुरवठा करता येत नाही त्यामुळे पिकांचे तसेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.या होणाऱ्या नुकसानास विद्युत वितरण विभागच जबाबदार राहील.त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.ह्या निवेदनच्या प्रति, सहाय्यक जिल्हाधिकारी,तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना ही देण्यात आल्या आहेत
निवेदनावर तळवे येथील पोलीस पाटील भरत पाटील,धानोरा येथील पोलीस पाटील बापू पाटील,किसान मोर्चाचे महेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे संदीप पाटील, हरकलाल पाटील,सुभाष पाटील,अनिल पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.