शहादा । प्रतिनिधी
धुमधडाक्यात विवाह झाल्यानंतर 24 तास होत नाही तोच नवरदेवाचा जिवलग मित्र याला विजेचा धक्का लागल्याने निधन झाल्याची दुःखद घटना लोणखेडा येथे घडली असून लग्न घरात व मयत मुलाच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर वृत्त असे की, लोणखेडा येथे आपल्या जीवलग मित्राचे लग्न दि. 9 रोजी पार पाडले. दुसऱ्या दिवशी गुळण्या टाकण्याचा कार्यक्रम चालू असताना चि.गणेश गिरासे (वय 24) रा. दोंदवाडा (मध्यप्रदेश) हल्ली मुक्काम लोणखेडा,ता. शहादा याला मंडपाच्या लोखंडी पाईपचा विजेचा धक्का लागला. गुळण्या टाकण्याचा कार्यक्रम असल्याने गणेशचे अंग व कपडे पाण्याने भिजले होते. विजेचा धक्का एवढा जबरदस्त होता की त्याला सोडायला गेलेले तीन ते चार व्यक्तीही फेकले गेले.विजेचा धक्का लागल्याने गणेश जागीच बेशुद्ध झाल्याने त्यास खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासणी नंतर त्याला मृत घोषित केले. सदर घटना नातेवाईक व परिसरात पसरताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश हा आपल्या उदरनिर्वाहासाठी लोणखेडा येथे सुप्रिया ऑटो गॅरेज चालवून दुचाकी दुरुस्तीचे काम करत होता. अत्यंत हसतमुख व मनमिळावू स्वभावाचा असल्याने मित्रपरिवार व परिसरात घटनेबद्दल दुःख व हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गणेश हा घरात एकुलता एक मुलगा होता आई वडिलांची जबाबदारी त्यावरच होती. या घटनेने सदर गिरासे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








