नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील सुंदर्दे येथे धाडसी घरफोडी होवुन सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार तालुक्यातील सुंदर्दे येथील भगवान शिवराम सुतार हे आपल्या परिवारासमवेत सुरत येथे गेले होते . चोरट्यांनी बंद घराच्या मागील दरवाजाची लाकडी फळी तोडुन आत प्रवेश केला . घरातील कपाटात ठेवलेली सोन्याची अंगठी , राणीहार , कानातले टोंगल , मंगळसुत्र , एलजी कंपनीची एलईडी टि.व्ही.असा एकुण सव्वापाच लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला . घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते . श्वानने चोरट्यांचा काही अंतरापर्यंत माग दाखविला .
याप्रकरणी भगवान शिवराम सुतार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४ , ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय संदिप पाटील करीत आहेत .