नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेने शहरातील बेघरांना मोठा दिलासा दिला असुन दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत बेघरांना निवारा बांधकाम करण्यासाठी ९८ लाख ७५ हजार २१४ रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह सर्वसाधारण सभेत २३ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात देण्यासह लिलाव प्रक्रियेत चुकीची माहिती देणार्या अभियंत्यासह लिपिकावर कारवाईचा ठराव सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज शुक्रवार दि.६ रोजी नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला कळंबू येथील भारतीय सैन्यदलातील जवान, विदर्भात आलेल्या महापुरात वाहून गेलेल्या मयत यांच्यासह दुःखद निधन झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या अजेंड्यावरील २३ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
पालिकेच्या एप्रिल ते जून अखेर जमा आणि खर्चाचा तिमाही हिशोब आला मंजुरी मिळाली. आर्थिक वर्षात नवीन मालमत्तांचे पुरवणी आकारणी करणे. हरित क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत दोन खुल्या जागा विकसित करण्याकरिता सुधारित प्रस्तावास मंजुरी देणे. शहरातील विविध रस्त्यांवर मशीनद्वारे मार्किंग करून पांढरे पट्टे रंगविण्याच्या संभाव्य खर्चास मंजुरी देणे. नेहरू नगरातील खुल्या जागेत सामाजिक सभागृहाच्या बांधकामास मंजुरी देणे. गौतम नगरमध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व इतर पाच कामांचे अंदाजपत्रक मंजूर करणे. नगरपरिषद हद्दीत शाळा सुरू करण्यासाठी नाममात्र भाडेतत्वावर इमारतमिळण्यासाठी नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड या संस्थेने केलेल्या विनंती अर्जावर विचारविनिमय करणे. झराळीतील ११.० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्याच्या कामास सभेत मंजुरी देण्यात आली.
दरम्यान भंगार साहित्य लिलावात विद्युत विभागाचे अभियंता व लिपिकाने भंगार पोल विक्री बाबत नगरपरिषदेला चुकीची माहिती दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव आज शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. तालुका क्रीडा संकुलाची जागेचा विकास करण्यासाठी पालिकेकडे हस्तांतरण करणे बाबत शासन निर्णयाच्या विचारविनिमय करणे. सार्वजनिक शौचालयांची देखभाल व दुरुस्तीचा ठेका रद्द करून नव्याने ठेका देण्याचा निर्णय सभेत बहुमताने झाला.यासह कोरोना बाधित मृतांवर अंत्यविधी करण्यासाठी मानधन तत्वावर दोन कर्मचार्यांची नियुक्ती करणे. नगरसेवकांनी सुचविल्या नुसार कृष्णा नगर मध्ये मंजूर झालेली कामांऐवजी श्रीकृष्ण नगरमध्ये करण्यास मंजुरी देण्यात आली. सभेत उपनगराध्यक्ष रवींद्र पवार,मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती व नगरसेवकांनी सहभाग घेतला.