नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील कुंडल येथील युवतीचा खूनाचा उलगडा केला असुन जिवे ठार मारणार्या नरामधमास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, ललिता मोतिराम पाडवी (वय -२८) रा . कुंडलचा गुगलमलपाडा ता . धडगांव या तरुणीने अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून शिक्षण पुर्ण केले आणि कुटुंबाची आर्थिक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत तिने शिरपुर येथे सुतगिरणीमध्ये नोकरी मिळविली . दि.३०एप्रिल २०२२ रोजी ललिताने फोन करुन कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याचे सांगितले होते . दि.१ मे रोजी मुलगी ललिता घरी येणार होती परंतु रात्र झाली तरी मुलगी घरी आली नाही म्हणून कुटंबीय चिंतेत होते परंतु धडगांव येथून कुंडलचा गुगलमलपाडा येथे घरी येण्यासाठी वाहन मिळाले नसेल म्हणून ललिता धडगांव येथे तिच्या मावशीकडे गेली असेल या विचाराने कुंटुंबीय थोडे निश्चित होते . दुसर्या दिवशी सकाळी दि.२ मे रोजी धडगांव येथे राहणार्या ललिताच्या मावशीला कुंटुंबीयांनी तिच्याबाबत विचारले असता ललिताच्या मावशीने ती येथे आलीच नाही बाबत कळविल्याने ललिताचे कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली परंतु ललिता कुठेच मिळुन येत नव्हती किंवा संपर्क देखील होत नव्हता म्हणून कुटुंबीयांची चिंता वाढू लागली . दि.३ मे रोजी ललिताचे वडील मोतीराम सत्या पाडवी यांना समजले की , हरणखुरी ते सोमानी रस्त्यावरील लहान पुलाखाली एक बॅग पडलेली असून त्यात कागदपत्रे आहेत व त्या कागदपत्रांवर संगिता पाडवी असे नाव लिहीलेले आहे म्हणून ललिताच्या कुटुंबीयांनी त्याठिकाणी जावून पाहिजे असता ती बॅग व कागदपत्र ललिता हिचीच होती . आता मात्र कुटुंबीयांची चिंता शंकेत बदलू लागली म्हणून कुटुंबीयांनी हरणखुरी ते सोमानी रस्त्याच्या परिसरात शोध घेतला असता त्यांना बॅग व कागदपत्र मिळालेल्या पुलाच्या पुढे काही अंतरावर एका पुलाखाली एक तरुणीचा मृतदेह दिसला . मृतदेह पाहिला असता तो ललिताचा असल्याचा त्यांची खात्री झाली . तसेच तिची जीभ ही दाताखाली असल्याने त्यातून रक्तस्त्राव होत होता , मात्र मुलीचा मोबाईल तेथे नव्हता . मुलीची अवस्था पाहून त्यांना आपल्या मुलीसोबत काहीतरीघातपात झाल्याचा संशय आल्याने त्यांनी सदरची घटना धडगांव पोलीसांना कळविल्यानंतर धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली . मोतीराम सत्या पाडवी यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीताविरुध्द खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार केले . घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे , मोबाईल , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती . ग्रामीण भाग असल्यामुळे सी.सी.टी.व्ही . चा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते . वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व धडगांव पोलीस ठाण्याच्या अमंलदारांचे मिळुन वेगवेगळे ६ पथके तयार करुन पथक तपासासाठी रवाना करण्यात आले . गुन्हा दाखल होवून १ दिवस लोटला होता परंतु आरोपी किंवा इतर कोणतीही उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती त्यामुळे अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधीकारी , शहादा अक्कलकुवा श्रीकांत घुमरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे धडगांव येथेच तळ ठोकून होते . अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी मयताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सुरुवातीस कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले व ललिताच्या मारेकर्यांना आम्ही शोधुनच काढु अशा विश्वास त्यांना दिला . त्यामुळे कुटुंबीय देखील पोलीसांना ललिताबाबत शक्य तेवढी माहिती देत होते . परंतु त्यावरून ललिताला का मारण्यात आले ? याचा बोध हात नव्हता . पोलीस पथकांनी ललिताचे सर्व नातेवाईक , मैत्रिणी तसेच ती काम करीत असलेल्या शिरपूर याठिकाणी जावून सखोल तपास केला परंतु कोणतीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती . दि. ७ मे रोजी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , सुमारे ६ ते ७ दिवसापूर्वी हरणखुरी ते सोमाणी रस्त्यावरील एका पुलावर रात्रीच्या वेळेस एक तरुण व तरुणी मोटर सायकल बाजुला लावून बसलेले होते व तो तरुण मुंदलवड चिरखेडपाडा येथील टिका असावा कदाचीत त्यानेच ललिताचा घातपात केलेला असावा अशी बातमी मिळाली . मिळालेली बातमी अतिशय त्रोटक होती परंतु गुन्हा दाखल होऊन ३ दिवस झाल्यानंतरही पोलीसांच्या हाती काहीच लागत नव्हते .
म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी बातमीची खात्री करुन बघू याउद्देशाने मुदलवड चिरखेडपाडा येथील टिका यास ताब्यात घेवून चौकशी करण्यासाठी धडगांव पोलीस ठाणे येथे घेवून आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना सुचना दिल्या . मिळालेल्या सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंदलवड चिरखेडपाडा येथे जावून टिका याची माहिती काढली परंतु गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीच्या टोपन नावाशिवाय इतर कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या , तरी देखील पथकाने आरोपीताबाबत इत्यंभूत माहिती प्राप्त केली . संशयीत टिका घरी नसून त्याच्या शेतात गेला असल्याचे समजुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सातपुडा डोंगरात १० ते १२ कि.मी. पायपीट करीत त्याचे शेत गाठून त्याच्या शेताच्या आजुबाजुला सापळा रचला . पोलीस आल्याची चाहूल लागताच संशयीत टिकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने मनोज ऊर्फ टिका भिमसिंग वळवी (वय ३६) रा . मुंदलवडचा चिरखेडपाडा ता . धडगांव ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास धडगांव पोलीस ठाणे येथे आणून विचारपुस केली असता संशयीत आरोपी मनोज ऊर्फ टिका याने अतिशय धक्कादायक माहिती सांगितली की , तो मयत ललिता हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता व तीस लग्नासाठी तगादा लावत होता.दि.१ मे रोजी मनोज धडगांव येथे त्याच्या कामानिमीत्त आलेला असतांना त्यास मयत ललिता पायी जातांना दिसली . मनोजने ललिता हिस घरी सोडुन देतो असे सांगून ललिताला त्याच्या मोटर सायकलवर बसवून निघाला हरणखुरी ते सोमाणे रस्त्यावरील पुलाजवळ गाडी थांबवून मनोजने ललिताला पुन्हा लग्नासाठी विचारले परंतु ललिता त्यास स्पष्ट नकार देवु लागली म्हणून मनोजला त्या गोष्टीचा राग आला व मनोजने ललिताच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळून तिस जिवेठार मारले व ललिताची बॅग , मोबाईल घेऊन तेथून पळ काढला व थोड्या अंतरावर जाऊन ललिताची बॅग एका पुलाखाली फेकुन दिली व मोबाईल घेऊन निघून घरी आला अशा आशयाची माहिती दिली . स्थानिक गुन्हे शाखा व धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी अतिशय क्लिष्ट व संवेदनशील अशा गुन्ह्याचा छडा लावला म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक गौरव सिंह ,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखा व धडगांव पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले . सदरची कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक गौरव सिंह, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधीकारी , शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे , स्थानिक गुन्हे शाखेचे सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अमंलदार व धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस अमंलदार यांच्या पथकाने केली आहे..