नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार नगरपालिकेच्या गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दि. २३ मार्च २०१८ जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चौकशी अहवाल अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयातच आजही प्रलंबित असल्याचा दावा करत न्यायालयाने दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ काढत जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप न.पा. विरोधी पक्षनेता ॲड. चारुदत्त कळवणकर यांनी केला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, नंदुरबार पालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी राज्य शासनाच्या चौकशीबाबत चाल-ढकल होत असल्याने व नंदुरबार शहरातील विविध प्रकल्पांना १२० कोटींची रस्ते योजना, ५५ कोटींचा भुमीगत गटारीचा प्रकल्प, पाणी पुरवठा योजना तसेच जमीनींचे आरक्षण, नाट्यगृह, इंदिरा मंगल कार्यालय, सी. बी गार्डन या वास्तुंमध्ये झालेला गैरव्यवहाराबाबत केंद्र शासनाच्या सक्त वसुली संचालनालयामार्फत गैरव्यवहाराची चौकशीसाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नसल्याने याचिका फेटाळली आहे. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्यास भारतीय दंड विधान कलम १५६ (३) नुसार न्यायलयात दाद मागता येत असल्याचे न्यायालयाच्या निकालात नमूद असल्याचे म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून यामुळे आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याबाबत पोलीसात तक्रार दाखल करणार आहोत. तसेच महाराष्ट्र शासनाची चौकशी अद्यापही प्रलंबित आहे व नुकतीच नाट्यगृह, इंदिरा मंगल कार्यालयात, सी.बी गार्डनबाबत ही तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यामुळे कुठेही दुध का दुध व पानी का पानी झाले नसुन उच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढून जनतेची दिशाभुल माजी आ. रघुवंशींनी थांबवावी, नगरपालिकेत कुठलाच गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला नसल्याचा खोटा दावा त्यांनी केला असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.