शहादा ! प्रतिनिधी
शहादा येथे सापासोबत स्टंटबाजी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे . तो नागासोबत स्टंटबाजी करतांना नागाने त्याच्या गालावर दंश केल्याने तरुणावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले .
सद्यस्थितीत अनेकजण सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सापांसोबत स्टंटबाजी करणे , सापाचे चुंबन घेणे , सापाला गळ्यात घालून फोटो काढणे असे प्रकार करतांना दिसून येतात . साप पकडण्याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना साप हाताळणे , स्वतःला सर्पमित्र म्हणत असा प्रकार अनेकदा होत असल्याचे दिसून येते . अशाचप्रकारे नागासोबत स्टंटबाजी करतांना शहादा येथील एका तरुणाला विषारी नागाने गाल व तोंडावर चावा घेतला आहे . सदर तरुणावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात औषधोपचार आले आहे.सुदैवाने सदर तरुणाची प्रकृती स्थिर असल्याचे समजले आहे.सोशल मिडीयावर स्वतःला प्रसिध्द करण्यासाठी अनेकदा असे प्रकार घडतात.मात्र याकडे वनविभागाचे सर्रास दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे . यामुळे वेळोवेळी अशा स्वयंघोषित सर्पमित्रावर कारवाई करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे . दरम्यान , या प्रकारामुळे साप आणि इतर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे . वन्यजीव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ अन्वये वन्यजीव हाताळणे , त्याला त्रास देणे , त्याचासोबत फोटो काढणे गुन्हा असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करून आळा घालावा अशी मागणी सर्पमित्रांकडून करण्यात येत आहे .