खापर l प्रतिनिधी
शासनामार्फत मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा निर्धार सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांनी केला आहे.’उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत होराफळी (ता. अक्कलकुवा) येथील मदर तेरेसा महिला प्रभाग संघटनेचे अधिवेशन शुक्रवारी होराफळीच्या झारीमौलीपाडा येथे पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेद च्या तालुका अभियान व्यवस्थापक मिनाक्षी वळवी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून वॉटर डॉट ओआरजी चे जिल्हा समन्वयक सागर सनेर, आयबीसीबीच्या तालुका व्यवस्थापक पिंकी वळवी, तालुका व्यवस्थापक किशोर पवार, संभाजी पावरा, बलराम झांजरे, राजेश राठोड, निखिल शिर्के, नमश्री वसावे, दुर्गाबाई वसावे आदी उपस्थित होते.
मिनाक्षी वळवी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत विविध प्रकारचे स्वयं रोजगार सुरू केले आहेत. होराफळी ला सिताफळ व जांभूळ प्रक्रिया उद्योग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यातून १०० पेक्षा अधिक महिलांना स्वयं रोजगार मिळाला आहे. शासनाच्या अर्थसहाय्याच्या माध्यमातून महिलांनी रोजगार, स्वयं रोजगार सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन केले.
सागर सनेर यांनी मार्गदर्शन करताना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. किशोर पवार, राजेश राठोड यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी सिटीसी शेवंती जयसिंग वसावे, प्रेरिका आठूबाई राश्या वसावे, प्रभाग संघाच्या अध्यक्ष आशा टेंबऱ्या वसावे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रभाग संघाच्या कोषाध्यक्ष मनिला गोविंद पाडवी यांनी लेखापरीक्षण अहवालाचे वाचन केले. प्रभाग संघाचे लेखापाल गुलाबसिंग रामा वसावे यांनी साखळी पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी दहेल येथील जीवनज्योती महिला ग्रामसंघाला समुदाय गुंतवणूक निधीसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला. प्रभाग समन्वयक अरविंद बागले यांनी लिहिलेल्या प्रभाग संघटन माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या वार्षिक सर्व साधारण सभेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यात भातिजी महाराज, किरण, तुलसी,यांना उत्कृष्ट ग्रामसंघ,सातपुडा, सोनू, मालवी यांना उत्कृष्ट समूह तर उत्कृष्ट प्रेरीका आठुबाई वसावे, रमिलाबाई वसावे, उत्कृष्ट सिटीसी शेवंती वसावे, उत्कृष्ट प्रभाग स्तरीय समुह साधन व्यक्ती सुनीता वसावे, उत्कृष्ट वर्धीनी रमिला लालसिंग वसावे, उत्कृष्ट लेखापाल गुलाबसिंग वसावे, उत्कृष्ट ग्रामसंघ सहाय्यक रायसिंग वसावे, दिलवरसिंग वसावे, मनश्या वसावे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाग संघाचे अध्यक्ष आशा वसावे, सचिव गीता वसावे, कोषाध्यक्ष मनिला पाडवी, रायसिंग वसावे, जयसिंग वसावे, दिलवरसिंग वसावे, मनश्या वसावे, गुलाबसिंग वसावे, गोविंद पाडवी, लालहीन वसावे, दिनकर वसावे, प्रभागातील समुदाय संसाधन व्यक्तीनी परिश्रम घेतले.