शहादा ! प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील राखीव वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोड प्रकरणी अटकेत असलेल्या सात जणांना सोडण्यात यावे या मागणीसाठी लंगडी भवानी,शहाणा परिसरातील नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले . याप्रकरणी ८७ संशयितांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे .
दि.१८ जुलै रोजी शहादा तालुक्यातील लंगडी भवानी येथील राखीव वनक्षेत्रातील सुमारे सात हेक्टर जागेवर अज्ञात जमावाने वनकर्मचाऱ्यांना धमकावून मोठ्या प्रमाणात वक्षतोड केली . याप्रकरणाची दि.२९ जुलैला वनविभागाने याप्रकरणी सात संशयितांना अटक केली . त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . दरम्यान , अटकेतील संशयितांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यानंतर लंगडी भवानी शहाणा व परिसरातील शेकडोंच्या जमावाने न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर दोंडाईचा रस्त्यावरील उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.वनविभागाने केलेली कारवाई ही अन्यायकारक असून अटकेतील संशयितांना तत्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी उपवनसंरक्षक कार्यालयात रात्री १२ वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले .
उपवनसंरक्षक कार्यालयात मोठ्या प्रमाणात आंदोलक आल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांत अधिकारी डॉ . चेतन गिरासे , उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे , तहसीलदार डॉ . मिलिंद कुलकर्णी , उपवनसंरक्षक कृष्णा भवर , पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी या आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा केली . मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते . कुठल्याही परिस्थितीत अटकेतील संशयितांची त्वरित सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली होती . रात्री उशिरा ग्रामस्थ गावी परतले . यावेळी उपवनसंरक्षक कार्यालयावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता .