नंदुरबार | प्रतिनिधी
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार २१ मार्च रोजी साजरा होणार्या शिवजयंतीनिमित्त नंदुरबार शहरात आज पूर्वसंध्येला शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जल्लोषात मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मिरवणूक मार्ग शिवप्रेमींनी गजबजला होता.

छत्रपती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नंदुरबार शहरातील ग्यारामील कंपाऊंडपासून रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला मोटर सायकल रॅली काढण्यात आली. गिरीविहार गेट मार्गे सिंधी कॉलनी, करण चौफुली, कोरीट नाका पुन्हा गिरिविहार गेट मार्गे उड्डाणपूल, गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, टिळक रोड, जळका बाजार, शिवाजी चौक, देसाईपुरा, दादा गणपती मोठा मारुती मंदिर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात येऊन पोहोचली.या मोटर सायकल रॅली शिवप्रेमी मध्ये मोठा उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर या ठिकाणी रॅलीच्या समारोपावेळी रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व प्रतिमापूजन कार्यक्रमाने रॅलीची सांगता झाली. यावेळी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मिरवणूक मार्गावर पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.








