नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील बँन्ड वाद्य वाजविणारा 18 वर्षीय युवक व गुजरातमधील 19 वर्षीय तरूणी या दोघांमध्ये प्रेम झाले होते.मात्र गुजरातमधील 19 वर्षीय तरूणी हिचा 15 दिवसापूर्वीच विवाह झाला.
प्रेम विवाहाला दोन्ही कुटूंबियातील सदस्य मान्य करणार नाही म्हणून आपले लग्न होणार नसल्याच्या नैराश्यातून प्रेमीयुगुलाने नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असताना रात्रीच्या गस्तीवर असलेले लोहमार्ग पोलीसांनी वेळीच शर्थीचे प्रयत्न करून दोघांचा जीव वाचविण्यात यश आले.
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक प्रेमीयुगूल आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र रात्रीच्या गस्तीवर असलेल्या रेल्वेच्या महिला कॉन्स्टेबल अनिता चौधरी यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची हकीकत प्रभारी सहाय्यक अधिकारी रमेश वावरे यांना दिली व ते स्वतः कर्मचाऱ्यांसह रेल्वे स्टेशनवर जाऊन. वरील दोघा प्रेमीयुगुलास रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अनिता चौधरी, पोकॉ.शशिकांत धरूटे, पोना.योगेश चौधरी, पोकॉ.मोहन डांगे यांनी आणले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी दोघांना विचारपूस केली असता सुरूवातीस उडवा-उडवीचे उत्तरे देवू लागली. मात्र काही तासा नंतर मुलीने सांगितले की, माझे 15 दिवसापूर्वी जे स्थळ न आवडणारे होते. त्याठिकाणी घरच्यांनी विवाह लावुन दिला. ते मला मान्य नसल्याने सासरी जाण्यास तयार नव्हती. आम्ही दोघे वेगळ्या समाजाचे असल्याने दोन्ही घरातील मंडळी विरोध दर्शवतील म्हणून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती दोघांनी पोलीसांना दिली. यातील तरूण हा नंदुरबार तालुक्यातील तर विवाहित तरूणी ही गुजरात राज्यातील कुकूरमुंडा तालुक्यातील असल्याचे सांगितले. आम्ही आत्महत्याच करू असे वेळोवेळी सांगत होते. यावेळी लोहमार्ग रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी दोघांना समज देवून त्यांचे मनपरिर्वतन केले. यानंतर प्रभारी सहाय्यक अधिकारी लोहमार्ग नंदुरबार रमेश वावरे यांनी दोघांच्या पालकांचे नंबर घेत संपर्क करून रेल्वे पोलीस ठाण्यात बोलुवन सदर घटने बाबत माहिती दिली व दोघा प्रेमीयुगुलाचे मनपरिवर्तन करत दोन्ही प्रेमीयुुगुल आपापल्या पालकांसोबत स्वखुशीने जाण्यास तयार झाल्याने त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत दोन्ही पालकांनी रेल्वे लोहमार्ग नंदुरबार पोलीसांचे आभार मानले आहे.








