नंदुरबार ! प्रतिनिधी
ग्रामसडक योजनेंतर्गत तोरणमाळ ते खडकी तसेच तोरणमाळ ते सिंधीदिगर हे दोन रस्ते अपूर्णावस्थेत असून याठिकाणी दोन गंभीर अपघातांच्या घटना घडल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आरटीओ आणि रस्त्याचे ठेकेदार या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिग्विजयसिंग राजपूत यांनी निवेदनातून केली आहे . हे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्री कार्यालयाला पाठविले आहे .
या निवेदनात म्हटले आहे की , जिल्ह्यातील ग्रामीण तसेच सातपुड्याच्या दुर्गम भागात खराब व अपूर्ण रस्ता कामांमुळे अपघात वाढले आहे . अर्धवट रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत.पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत तोरणमाळ ते खडकी तसेच तोरणमाळ ते सिंधीदिगरअशा दोन रस्त्यांची कामे २०१४ ला सुरू करण्यात आली . मात्र , कासवगतीने ही कामे झाली असल्याने आजही अपूर्णावस्थेत आहेत . या रस्त्यावर २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला . दरम्यान , १८ जुलै रोजी पुन्हा सिंधीदिगर रस्त्यावर अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला होता . संबंधित विभागाने नेहमीप्रमाणे सखोल चौकशी केली असता , अपूर्ण रस्ते तसेच अपूर्ण सुविधांमुळे अपघात झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे . मानवनिर्मित चुकांमुळे हा अपघात झाला असल्याने रस्ता कामात दोषी असलेल्यांवर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा . तोरणमाळ परिसरातील दोन्ही अपघातात झालेल्या जीवितहानीला जबाबदार असलेले असलेले ग्रामसडक योजनांचे अभियंते , रस्ता मंजुरी ते बिल काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील सर्वच लहान मोठे – कर्मचारी किंवा अधिकारी , आरटीओ व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा . जिल्ह्यात ठरवण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्यात यावे , जिल्ह्यातील सर्वच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अपूर्ण कामांची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे .