शहादा | प्रतिनिधी
तालुक्यातील शेतकर्यांची ४७ लाख रुपयांची पपई खरेदी करून त्यांचे पैसे न देता पसार झालेल्या व्यापार्यास शहादा पोलीस व तालुक्यातील शेतकर्यांनी संयुक्तरीत्या तब्बल तीन दिवसांचा अथक परिश्रमानंतर उत्तर प्रदेशातून सरफराज इदवा चौधरी (रा. हापूड, उत्तरप्रदेश) या व्यापाऱ्याला ताब्यात घेत शहादा गाठले. संशयितास पोलिसांनी शहादा न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरफराज चौधरी याने तालुक्यातील कलमाडी, मोहिदा, पिंगाने, शेल्टी आणि औरंगपूर येथील सुमारे ३० शेतकर्यांकडून पपई खरेदी करून त्यापोटी देय असलेले ४७ लाख रुपये न देता पळ काढला. याप्रकरणी शेतकर्यांनी शहादा पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताच्या पोलिसांकडून शोध सुरू असताना त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मोरे व पोलीस कर्मचारी व शेतकर्यांनी संयुक्तरीत्या पथकाने दिल्ली गाठली. स्थानिक नागरिक व स्थानिक पोलिसांशी संबंधितांनी संपर्क साधला असता संशयित व्यापाराला याठिकाणाहून पकडून नेणे अवघड आहे. अशी माहिती मिळत होती. परंतु पोलीस पथक व शेतकर्यांनी जिद्दीने तीन दिवसानंतर संबंधित संशयितास ताब्यात घेऊन तब्बल १७ तास प्रवास करत शहादा गाठले. संशयित चौधरी यास पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसापर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. व्यापाराच्या अटकेचे शेतकर्यांकडून स्वागत करण्यात आले.