नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोनाने होरपळलेल्या नागरिकांकडून सक्तीची कर वसूली करुन नागरिकांना आत्महत्येस भाग पाडण्यासारखे आहे.यामुळे वसूली करतांना जनतेच्या परिस्थितीचा विचार करण्यात यावा. मुंबई पॅटर्न वापरुन कर माफ करण्यात यावा, अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवितांना आधी पुनर्वसनाचा विचार करण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.
सद्यस्थितीत पालिकेचे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कर वसूली आणि अतिक्रमणावरुन राजकारण चांगलेच तापले असून या पार्श्वभूमीवर भाजपाची भूमिका मांडण्यासाठी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी माजी आ.शिरिष चौधरी, पालिका गटनेते चारुदत्त कळवणकर यांच्यासह भाजपा नगरसेवक उपस्थित होते. यावेळी विजय चौधरी पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या ५०० स्वे.फुट जागा असणाऱ्या नागरीकांची सरसकट कर वसूली माफ करत दिलासा दिला. तो आदर्श घेवून नंदुरबार पालिकेमध्ये तसाच पॅटर्न का राबविण्याची गरज आहे. नुकतीच पालिकेत करवसूली संदर्भात आयोजित बैठकीत प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना नेमक्या कोणत्या अधिकाराने निमंत्रित केले असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला.दरम्यान, माजी आ.रघुवंशी कोणत्याही पदावर नसतांना अधिकाऱ्यांना धमकावतात,सक्तीची वसूलीचे आदेश देतात,कर थकबाकी असणाऱ्यांच्या घराबाहेर बोर्ड लावण्याचे आदेश देणे घटनाबाह्य असल्याचे चौधरी यांनी सांगितले. यावेळी माजी आ.शिरीष चौधरी यांनी पालिकेत होणारी प्रत्यक्ष कर वसूली आणि कागदोपत्री दाखविली जाणारी कर वसुली यात तफावत असल्याचा आरोप केला. तसेच शहरातील वाढलेले अतिक्रमण हटवितांना सत्ताधाऱ्यांनी स्वत:पासून सुरूवात करावी आणि मगच नागरिकांचे अतिक्रमण काढण्याचे सांगितले. दरम्यान, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसिलदार यांनी घटनाबाह्य बैठक घेतल्याने त्यांच्यावर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले.








