शहादा l प्रतिनिधी
महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी न करणार्या शैक्षणिक संस्था व इतर संस्थांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनाच्या आशय असा : प्रत्येक शासकीय कार्यालय व शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रपुरुशांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात यावी याबाबतचे आदेश राज्य शासनाने काढले असून या आदेशाचे पालन करावे अशा सूचनाही दिल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. राष्ट्रपुरुष हे देशाची संपत्ती असून त्यांचे काम, कार्य विद्यार्थ्यांना माहीत व्हावे, त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील एस. ए. मिशन या संस्थेमध्ये राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कधीही साजरी केली जात नाही. या संस्थेमार्फत राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने तसेच संबंधित संस्थाचालक जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांच्या अवमान करीत असल्याने याची चौकशी करण्यात येऊन संस्था चालकासह जबाबदार दोषींवर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे यापुढील सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करण्याचे आपण आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार,, डॉ. सागर पाटील, दिलीप पाटील, मुरलीधर वळवी, इंद्रिस मेमन, लिलाचंद सोळंकी, गणेश चित्रकथे, बापू चौधरी,भगवान अलकरी आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.