मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे रोखठोक मत
नवी मुंबईत होत असलेले विमानतळ हे मुंबई विमानतळाशी संबंधित असणार आहे. त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे योग्य असल्याचे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी नाेंदवले.
राज ठाकरे म्हणाले, प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी आहे. बाळासाहेबांचे नाव देण्याची भूमिका सरकारची आहे. यावरूनच संघर्ष सुरू आहे. कोणतेही विमानतळ येते ते शहराबाहेर येते. तेव्हा विमानतळ सांताक्रूझला गेले. त्या वेळी मुंबई विकसित झाली नव्हती. मग वाढवत ते सहारापर्यंत गेले आणि मग त्याला सांताक्रूझ विमानतळ आणि सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आले. मात्र नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज असेच नाव द्यावे, असेही राज म्हणाले.
बाळासाहेबांच्या नावावर राजकारण नको : सावंत :दि. बा. पाटील यांनी चांगले काम केले यात वादच नाही. पाटील यांचे नाव वेगळ्या प्रकल्पासाठी देऊ. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्याने पाहिली आहे. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे योग्य ठरेल. बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करू नये, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले.