नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास शेतकर्यांनी मुग, ज्वारी पिकाऐवजी मका, तूर व बाजरी या पिकाची पेरणी करण्याची शिफारस कृषि विभागाने केली आहे.
जिल्ह्यात जून महिना अखेर सरासरीच्या ४३.९० टक्के पाऊस झालेला असून १ जुलै ते आजपर्यंत सरासरीच्या १९.२० टक्के इतका पाऊस झाला आहे. जूनपासून १९ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ३०.४० टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी १९ जुलैपर्यंत ५०.६० टक्के पाऊस झाला होता.
जिल्ह्यातील नवापूर (२८.५० टक्के), तळोदा (२७.४० ) व अक्क्लकुवा (२८.८०) या तालुक्यात कमी पर्जन्यमान झाले असून २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी १९ जुलै अखेर २ लाख १३ हजार ४५० हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
विभागीय विस्तार केंद्र धुळे व जिल्हा व्यवस्थापक महाबीज धुळे यांनी आपत्कालीन पिक नियोजनासंदर्भात चर्चा करुन पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर मुग आणि १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी होणार नाही असे अपेक्षित असताना त्याऐवजी शेतकर्यांना मका, तुर आणि बाजरीची पेरणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
भात पिकाची १५ ऑगस्टपर्यंत लावणी पद्धतीने उशिरा पाऊस झाला तरी पेरणी पुर्ण करावी. जिल्ह्यात ४-५ दिवसात पाऊस झाल्यास विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे मका, तुर व बाजरी पिकांची लागवड करावी. खरीप पड क्षेत्र राहिल्यास त्यात ऑगस्ट उशिरापर्यंत ओवा व एरंडी पिकांची लागवड अपेक्षीत आहे. तर जुलै महिन्याअखेर पर्यंत अक्क्लकुवा व धडगाव तालुक्यात भगर पिकाची लागवड पुर्ण होईल असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.