म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जयनगर येथे प्रसिद्ध असलेल्या श्री हेरंब गणेश मंदिरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी केली जाणार असून त्यानिमित्ताने भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाकडून करण्यात आले आहे.
जयनगर येथील मंदिरात श्री. गणेशाची शुभ्र संगमरवरी उजव्या सोंडेची मूर्ती असून दरवर्षी भाविक येथे मंगळ चतुर्थी आणि गणेश जयंतीला मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. येथील या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी येथे खानदेशसह गुजरात व मध्य प्रदेश येथून भाविक मोठ्या प्रमाणावर मानलेला नवस फेडण्यासाठी येत असतात.
शुक्रवारीही गणेश जयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता आरती, महाअभिषेकने गणेश जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच होमहवन पूजा, मोदक स्वाहाकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसाद ऐवजी छोटासा प्रसादाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. तरी भाविकांनी तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालनसहित दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरालाल माळी यांनी केले आहे.