युवाशक्ती ही राष्ट्रासाठी व आपल्या समाजासाठी वापरली गेली पाहीजे. युवा संघटनातून देशासह समाजासाठी हितावह बदल घडत असतात. पुढील होऊ घातलेल्या नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणूका लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर युवकांचे संघटन उभारुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कामाला लागेल, असा विश्वास राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे यांनी व्यक्त केला. ते येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत बोलत होते.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे नुकतेच नंदुरबार जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. बैठकीत जि.प.सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, राष्ट्रवादीचे युवानेते ॲड.राऊ दिलीपराव मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्यजित सिसोदे यांनी आपल्या मार्गदर्शनात युवकांचे संघटनावर भर दिला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत कशी पोहोचेल यासाठी युवकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.