नंदुरबार | प्रतिनिधी
गांधीधाम पुरी एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीकारमध्ये ज्वलनशील कारणाने आग लागवणार्या अज्ञाताविरूध्द नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार येथे दि.२९ जानेवारी रोजी १०.१५ वाजेच्या सुमारास सुरतहून आलेली गांधीधाम पुरी एक्सप्रेस गाडीच्या पॅन्ट्रीकार डब्यांना आग लागली होती. या आगीत डबे पुर्णतः जळून खाक झाले नंदुरबार रेल्वे स्थानकात प्रवेश करत असतांना उड्डाणपुलाजवळ रेल्वे गाडीच्या दोन्ही डब्यांना आग लागली. या आगीमुळे खळबळ उडाल्याने रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीसांसह शहर पोलीसांनी सतर्कता बाळगता तत्काळ प्रवाशांनी खाली उतरवून आग लागलेल्या डब्यांपासून रेल्वे गाडीला वेगळे केले. तसेच दोन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर गांधीधामपुरी एक्सप्रेस लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन बंबास यश आले. परंतु या डब्यांना कशामुळे आग लागली याचे कारण समजू शकले नाही. रेल्वे विभागाकडून निरीक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवालावरून अज्ञात व्यक्तीच्या बेजबाबदार कृत्यामुळे आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या आगीमुळ रेल्वे मालमत्तेचे सुमारे १० लाखांचे नुकसान होवून रेल्वे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. म्हणून स्टेशन प्रबंधक निहाल अहमद अब्दुल अजिज इनामदार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द भारतीय दंड संहिता १८६० चे कलम २८५, ३३६, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करत आहेत.