नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदूरबार येथील रेल्वेस्थानकापासून अर्धा किमी अंतरावर गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या स्वयंपाकाच्या बोगीला अचानक आग लागली. क्षणार्धात संपूर्ण बोगीने पेट घेतला. आग लागल्यामुळे रेल्वे रेल्वेस्थानकाच्या अलिकडेच चैन खेचून थांबवण्यात आली. आग लागल्याचे लक्षात येतात प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. यावेळी झालेल्या पळापळीत दोन प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. नंदूरबार शहर पोलिसांनी नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला फोन केला .अग्नीशमन बंबाने शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. यावेळी तब्बल दोन तास पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मोठया प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
दुपारी १.५३ दरम्यान गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रवाना झाली.
नंदुरबार रेल्वेस्थानकावर गांधीधाम-पूरी ही एक्सप्रेस रेल्वे आज सकाळी १०.१५ वाजता येणार होती. परंतू रेल्वेच्या पेंट्री कार अर्थात स्वयंपाकाच्या बोगीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच सफाई कर्मचाऱ्यांनी चैन खेचत रेल्वे स्थानकाच्या शंभर मीटरच्या बाहेरच थांबवण्यात आली. त्यावेळी या बोगीत तीन ते चार कर्मचारी होते. या पेंन्ट्री कारच्या बाजूला असलेल्या बी ५ या बोगीत २५ ते ३० प्रवासी होती. आधी त्यांना बोगीच्या बाहेर उतरविण्यात आले. इतर प्रवाशांना याबाबत माहिती नसल्याने काही काळ गोंधळ उडाला. त्यानंतर पेन्ट्री कारमध्ये आग लागल्याने समजल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट झाली. त्यामुळे रेल्वेच्या बाहेर निघण्यासाठी प्रवाशांमध्ये पळापळ झाली. यात पळापळीत महिलेसह दोन जण किरकोळ जखमी झाले. घटनेबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती देण्यात आल्यानंतर उपाययोजना सुरु करण्यात आल्या. यावेळी नंदूरबार शहर पोलिसांनी फोन करत नगरपालिकेच्या अग्नीशमन बंबला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला पेन्ट्री कार ही बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली. पाहता पाहता आग संपूर्ण बोगीत पसरली. या बोगीत असलेले सर्व खाद्य पदार्थ, धान्य, फळे, भाज्या, दूध, ताक यासह सर्वच किराणा व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. तब्बल दीड तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र,तोपर्यंत संपुर्ण बोगी जळून खाक झालेली होती. दरम्यान, या बोगीला लागलेल्या आगीच्या ज्वाळा रेल्वेच्या २५ हजार व्होल्टच्या तारांजवळून जात होत्या. परंतू वेळीच या तारांमधील वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, या रेल्वेच्या बी५ या लगतच्या डब्यात कार्यरत असलेल्या दोन कर्मचार्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी चेन पुलींग केली परंतू त्यात तांत्रिक बिघाड असल्यामुळे रेल्वे थांबली नाही. मात्र, रेल्वे प्रशासनाला मिळालेल्या सिग्नलमुळे सदर रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रवाशांना शांततेचे आवाहन बाहेर येण्यास सांगितले. सुर्दैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. तब्बल एक ते दीड तास आगीचा हा थरार सुरु होता. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, प्रांताधिकारी मिनल करनवाल, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व पोलीसांनी भेट देवून उपाययोजना केल्या.
दरम्यान, आग रेल्वेच्या विद्युततारांना आग लागू नये यासाठी २५ हजार व्होल्टचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक तब्बल दोन तास बंद होती. त्यामुळे एक्सप्रेस व रेल्वेगाडया नंदुरबार रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या. दुपारी १२.३३ च्या सुमारास आग लागलेल्या पेंट्री कारच्या बोगीला दुसर्या इंजिनच्या साहयाने घटनास्थळावरुन हलविण्यात आले. त्यानंतर १२.४२ ला नवजीवन एक्स्प्रेस रवाना झाली.त्यानंतर रेल्वे गाडया सुरु करण्यात आल्या. यावेळी कोलकाता-पोरबंदर, नंदुरबार-उधना मेमू ट्रेन, सुरत-भागलपूर एक्सप्रेस, छापरा-सुरत ताप्तीगंगा एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस या गाडया थांबवण्यात आल्या होत्या. त्यांनाही दुपारी मार्गस्थ करण्यात आले.
गांधीधाम-पूरी या एक्सप्रेसच्या पेंट्रीकारला नंदुरबार रेल्वेस्थानकानजिक आग लागली. त्यामुळे वेळीच सदर रेल्वे थांबवण्यात येवून आवश्यक त्या उपाययोजना त्वरीत करण्यात आल्या. मात्र, ही घटना नंदुरबार रेल्वेस्थानकापासून दूर अंतरावर घडली असती आणि भरधाव वेगात राहिली असती तर आगीने संपुर्ण रेल्वेला लक्ष्य केले असते आणि २५ हजार व्होल्टच्या विद्युतवाहिन्याही जळून मोठा अनर्थ घडला असता. परंतू रेल्वेतील प्रवाशांचे दैव बलवत्तर होते म्हणून केवळ एकाच बोगीला आग लागली आणि ती त्वरीत आटोक्यात आली.
गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या पेंट्रीकारच्या बोगीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याठिकाणी स्वयंपाक केला जात असल्यामुळे तेथे आगीचा संपर्क येतो. परंतू सध्या इलेक्ट्रीक शेगडीचा वापर करण्यात येतो परंतु कोरोना काळापासून स्वयंपाक बनविणे बंद असताना आग शॉर्ट सर्किटने लागली की, अन्य कारणाने याबाबत रेल्वे प्रशासनही अनभिज्ञ आहे. या बोगीत सिलींडरचा स्फोट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतू सदर बोगी ही एलएचबी कोच असल्यामुळे याठिकाणी इलेक्ट्रीक शेगडीचा वापर होत असतो तेथे सिलींडरला परवानगी नसते. जर सिलींडरचा स्फोट झाला असेल तर तेथे सिलींडर आलेच कसे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान या घटनेनंतर रेल्वे केव्हा जाईल असा प्रश्न प्रवाश्यांना पडला धुळे, जळगाव येथील अनेक प्रवासी नंदूरबार बसस्थानकात आले मात्र बस बंद असल्याने तेथून ही त्यांचा हिरमोड झाला.अखेर १.५५ वाजेच्या सुमारास गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रवाना करण्यात आली.