नंदुरबार l प्रतिनीधी
नवापुर तालुक्यातील झामणझर ग्रामपंचायत अंतर्गत बेडकीपाडा ते दादरीफळी दरम्यान रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या तक्रारीनंतर लोकप्रतिनिधींकडून नागरिकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने गावकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.
नवापुर तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या झामणझर ग्रामपंचायत अंतर्गत बेडकीपाडा ते दादरीफळी दरम्यान साडेचार किलोमीटर रस्त्याचे काम शासनाच्या परिपत्रकानुसार न करता नंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी, ठेकेदार यांच्यावतीने निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत सुधारणा व्हावी व चांगले काम करावे अशी मागणी केली असता सरपंच व जिल्हा परिषद सदस्य यांनी सदर नागरिकांना अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत नागरिकांनी नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे परंतु राजकीय वरदहस्तामुळे पोलीस कारवाई करत नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
सदर रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल तक्रारीनंतर अर्धवट काम करून ठेकेदार पसार झाला आहे यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या अंदाजपत्रकानुसार कोणतेही काम झालेले नसतानाही अधिकारी कारवाई करीत नाही. सदर गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील फरशी पूल ही धोकादायक असल्याने अपघातांमुळे नागरिकांचा जीवाला धोका आहे तरीदेखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. असे गावकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.