म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा येथे एका शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात माथेफिरूने परिपक्व झालेल्या पपई पिकाचे 50 ते 60 झाडे कापून फेकून दिले व फळे ही तोडून फेकली त्यामुळे हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाऊन आर्थिक नुकसान झाले.
बामखेडा ता शहादा येथील वसंत मंगळु पटेल यांनी तीन एकर क्षेत्रात पपई पिकाची लागवड केली असून पिके पूर्ण बाहरात असून व्यापाऱ्यांकडून ही सद्या चांगली मागणी सुरु आहे, यातच काल रात्री च्या सुमारास काही अज्ञात माथेफिरूंनी गावालगत ऊत्तरेस असलेल्या शेतातील 50 ते 60 झाडे कापून टाकली तसेच फळे तोडून फळ बागाचे नुकसान केले त्यामुळे शेतकऱ्याचे 30 ते 40 हजार रुपयाचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे.
यावर्षी मागील काही दिवसापासुन नाशवंत असलेल्या पपई पिकाला कमी भाव असल्यामुळे व मागील वर्षी लॉकडाउन मुळे शेतकरी अडचणीत आले होते .तर यावर्षी 3 ते 4 रुपये किलो दरामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे, उत्पादक शेतकऱ्यांनी पीक उभे करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून ही काही पपई उत्पादक शेतकऱ्यांना मातीमोल भावात ते विकावे लागत आहे , शहादा तालुक्यातील पपई मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते, त्यांमुळे तालुक्यातील पपई क्षेत्रही वाढले आहे, दुसरीकडे उत्तर भारतात बाजारपेठेत दर ही चांगले असले तरी स्थानिक व्यापारी मनमानी पद्धतीने खरेदी करतात.
पपईच्या एक हजार झाडामागे पन्नास च्या आसपास खर्च होतं असतो, आणि असे समाजकंटक झाडे कापून एका रात्रीत लाखोंचे नुकसान करतात,यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे,कोरोना, अवकाळी यामुळे आधीच नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे, आणि त्यात परत समाजकंटकाद्वारे असे नुकसान त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. शहादा तालुक्यातील व बामखेडा परिसतातील शेतकरी अशा नुकसानीमुळे पूर्णपणे हवालदिल होऊन आर्थिक अडचणींचा सामना करताना दिसून येत आहेत .तरी नुकसान करणाऱ्या अश्या अज्ञात माथेफिरुंच्या त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होतं आहे.
“मी तीन एकर क्षेत्रात पपई पिकाची लागवड केली आहे, यावर्षी शेतीदेखील चांगली बहरली आहे .मात्र काल रात्री काही माथेफिरूंनी माझ्या शेतातील पपई च्या 50 ते 60 झाडं कापून फेकली व विक्रीला आलेल्या फळांचे ही नुकसान केले, अश्या समाजकंटकांच्या त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्याची झळ पोहचणार नाही.
-वसंत मंगळू पटेल , बामखेडा, ता शहादा








