तळोदा l प्रतिनिधी
तलावडी ता तळोदा येथे कुडकाठीची मातीची भिंत तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लॉकरमध्ये ठेवलेले चांदीचे ४४ हजार सातशे रुपये रकमेचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे घटना घडली आहे. तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तलावडी येथे दि.८ जानेवारी रोजी रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान नाईका जमसा वळवी यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूची माती कुडकाठीची भिंत तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले १८ हजार ५०० रुपये किमतीचे ५० तोळे वजनाचे चांदीचे पायातील कडे एक जोड, १६ हजार ६५० रुपये किमतीचे ४५ तोळे वजनाचे १५ नग बांगड्या, २ हजार २२० रुपये किमतीचे चांदीचे सहा तोळे वजनाचे तीन बेले, ७ हजार ४०० रुपये किमतीचे २० तोळे वजनाचे पायातील पैंजण एक जोड, असे एकूण ४४ हजार ७७० रुपये किमतीचे चांदीचे ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. नाईका जमसा वळवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक निलेश खोंडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.








