नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदूरबार येथील उपनगराध्यक्षपदी कुणाल वसावे तर स्विकृत नगरसेवकपदी गजेंद्र शिंपी, शेख आरिफ कमर, जगन्नाथ लोटन माळी व सौ.ज्योती योगेश राजपूत यांची निवड करण्यात आली आहे.
नंदूरबार येथील नगरपालिकेत सर्व सदस्यांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विषय समिती सभापती व उपनगराध्यक्ष तसेच स्विकृत सदस्यांची निवड करण्यात येते. त्यानुसार विद्यमान उपनगराध्यक्ष व स्विकृत सदस्यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे निवड प्रक्रिया राबविण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसतर्फे कुणाल बटेसिंग वसावे तर भाजपातर्फे प्रशांत कन्हैय्यालाल चौधरी यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते. दरम्यान, कुणाल वसावे हे स्थायी समितीमध्ये सदस्य असल्यामुळे त्यांची उपनगराध्यक्षपदावर निवड होवू शकत नाही, याबाबत विरोधी प्रशांत चौधरी यांनी हरकत घेतली. सदर प्रक्रिया सुरु असतांना भाजपाच्या एका सदस्याने अपशब्द वापरल्याच्या कारणावरुन वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र, संबंधीत सदस्याने माफी मागताच हा वाद निवळला. यावेळी हात उंचावून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यात कॉंग्रेसचे कुणाल वसावे हे बहुमताने विजयी झाले.
दरम्यान, स्विकृत नगरसेवक पदासाठी कॉंग्रेसचे तीन तर भाजपाच्या एका सदस्याने नामांकन दाखल केले होते. यात कॉंग्रेसकडून गजेंद्र लक्ष्मण शिंपी, शेख आरिफ कमर, जगन्नाथ लोटन माळी तर भाजपाकडून सौ.ज्योती योगेश राजपूत यांचे एकमेव नामांकन दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पालिकेबाहेर मोठया प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. निवडीनंतर फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. तसेच निवडलेल्या सदस्यांची नगरपालिकेपासून आमदार कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
दरम्यान, भाजपाचे प्रतोद ॲड.चारुदत्त कळवणकर यांनी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या निवडीबाबत हरकत घेतली असून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कुणाल वसावे हे विद्यमान स्थायी समिती सदस्य आहेत. उपाध्यक्ष हा कायद्याप्रमाणे स्थायी समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून नगरपालिका अधिनियमानुसार सदस्य होत असतांना एक व्यक्ती दोनदा सदस्य होणे, तसेच उपाध्यक्ष हा कायद्याप्रमाणे नियोजन समितीचा अध्यक्ष असतो. त्या अनुषंगाने स्थायी समिती सदस्य हा इतर सभेतील अध्यक्ष किंवा सदस्य होवू शकत नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र करावा. अशाप्रकारे कायदेशीरित्या हरकत घेतली. मात्र, पिठासीन अधिकार्यांनी या हरकतीबाबत कुठलाही निर्णय न घेता उपाध्यक्ष निवडणूक घेवून महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमाचा भंग केला आहे. म्हणून कुणाल वसावे यांची उपाध्यक्षपदी झालेली निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी ऍड.कळवणकर यांनी केली आहे. निवेदनावर प्रशांत चौधरी, गौरव चौधरी, आकाश चौधरी, आनंदा माळी यांच्या सहया आहेत.








