नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रातून गुजरात राज्यात वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे तस्करी प्रकरणी सागबाराच्या धनशेरा चेकपोस्टवरून टॅट हॅरियर कार जप्त करण्यात आली असून याप्रकरणी अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्यास अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
राजपिपला विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेश परमार व सर्कलचे पोलिस निरीक्षक पी.पी.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस कर्मचारी गुजरात राज्यातील सेलंबा सागबारा येथील धनसेरा येथे वाहनाची तपासणी करीत असताना महाराष्ट्राकडून येणारी पांढऱ्या रंगाची टाटा हॅरियर कार (क्र. MH.18, CV. 4114 )थांबविण्याचा प्रयत्न करत असताना वाहन चालकाने त्यांचे वाहन थांबवले नाही. सागबारा पोलिस ठाण्यासमोरील महामार्गावर पोलिसांनी कारला रोखले. व वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिकीत एका मोठ्या राखाडी, पिवळ्या आणि पांढऱ्या जुन्या टॉवेलमध्ये गुंडाळलेल्या काळ्या पिशवीत वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे आढळून आले.याप्रकरणी सागबारा पोलिसांनी अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी किशोर भट्ट अहिरे (वय. ४०) रा. नेर, कुसुंबा ता. धुळे, हल्ली मू.गोल्डन सिटी, नंदूरबार यांना अटक करून पुढील तपासासाठी या प्रकरणाचा तपास आरएफओ सागबरानो यांच्याकडे सोपविला आहे.महाराष्ट्रातून गुजरात राज्यात वाघासारख्या वन्य प्राण्याचे कातडे तस्करी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वन्य प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी कृषी विस्तार अधिकाऱ्यास अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.








