नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या चिमट्यात बिबट्या अडकल्याची घटना घडली होती.दरम्यान तळोदा वन विभागाकडे तज्ञ टीम व अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे जळगाव व नाशिक येथील ट्रकुलाजेशन (रेस्क्यू) पथक प्रचारण करण्यात आले होते. रेस्क्यू पथकास येण्यास विलंब होत असल्याने व बिबट्याच्या वेदना वाढत असल्याने व दिवसभर बिबट उपाशी असल्याने त्याच्या प्रकृतीची चिंता घेत मानद वनजीव रक्षक नंदुरबार सागर निकुंभे यांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा लावून त्यात कोंबडीचे भक्ष ठेवले काही कालावधीतच भुके पोटी बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. दरम्यान यावेळी सागर निकुंभे व वन्य जीव संरक्षण संस्था नंदुरबारचे महेश तावडे व सहायक वनसंरक्षक मनोज रघुवंशी व विभागाच्या कर्मचाऱ्याने पिंजऱ्याजवळ जाऊन बिबट्याच्या पायातील चिमटा काढण्यात त्यांना यश आले. दरम्यान रात्री उशिरा बिबट्यास मेवासी वनविभागात आणण्यात आले. अडकलेला बिबट्यास पाहण्यासाठी गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी व बोरद दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. वनविभाग परिसरात गस्त घालून आहे.

गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या वास्तव्याने बोरद परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी मोड येथे दोन बिबटे मृत अवस्थेत आढळले होते. बोरद येथे शेतकरी पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतकरी तथा रखवालदार यांना बिबट्याने दर्शन दिले. ह्या घटनेला आठवडाही होत नाही तोवर गुरुवारी बोरद येथील करणखेडा रस्त्यावरील गंगापूर भागातील नाल्याच्या किनारा लागून असलेल्या शेतात शिकारासाठी लावण्यात आलेल्या चीमट्यात बिबट्याचा पाय अडकलेल्या अवस्थेत असल्याचे वाटसरू मजुरांना निदर्शनास आले. बिबट्याच्या डरकाळी फोडण्याचा व वेदनेने कण्हण्याचा आवाज आल्याने मजूर तात्काळ माघारी परतले व बोरद गाव गाठून याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली. सदर घटना कळताच बघणाऱ्यांची तोबा गर्दी केली. घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता बोरद येथील पंचायत समिती सदस्य विजय राणा, मंगेश पाटील, दिपक टेलर, रवी भिलाव, संतोष ढोधरे, सजन शेवाळे, गौतम भिलाव व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली तसेच बिबट्याच असल्याची खात्री पटल्यानंतर लागलीच तळोदा येथे वन विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल निलेश रोडे, बोरद वनपाल अपर्णा लोहार, राजविहिर वनपाल वासुदेव माळी, राणीपुर वनपाल नंदू पाटील, वनरक्षक राजा पावरा, शरद नाईक, ज्योती खोपे, लक्ष्मी पावरा, विरसिंग पावरा, भावना जाधव, चुणीलाल पाडवी, वाहन चालक दीपक जगदाळे आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याठिकाणी बिबट्याला बघितले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण परिस्थिती लक्षात घेता, जळगाव व नाशिक येथून ट्रकुलाजेशन पथकाला बोलविण्याचा निर्णय घेतला. पण सदर पथक घटनास्थळी पोहचण्यास विलंब होत असल्याने गर्दी पांगवणे वनविभागासमोर आवाहन बनले होते. बोरद दुरक्षेत्राच्या पोलिसांचा सहकार्याने जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रेस्क्यू पथक दाखल होण्यापूर्वी पूर्वनियोजन म्हणून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून त्याठिकाणी पिंजरा व जेसीबी उपलब्ध करण्यात आलेले होते. साधारणतः १२ ते १५ तासाचा कालावधी उलटल्यानंतर सायंकाळी उशिरा मानद वनजीव रक्षक नंदुरबार सागर निकुंभे यांच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा लावून त्यात कोंबडीचे भक्ष ठेवले काही कालावधीतच भुके पोटी बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश केला. दरम्यान यावेळी सागर निकुंभे व वन्य जीव संरक्षण संस्था नंदुरबार चे महेश तावडे व सहायक वनसंरक्षक रघुवंशी व विभागाच्या कर्मचाऱ्याने पिंजऱ्याजवळ जाऊन बिबट्याच्या पायातील चिमटा काढण्यात त्यांना यश आले. दरम्यान रात्री उशिरा बिबट्यास मेवासी वनविभागात आणण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक के.बी.भवर, सहायक वनसंरक्षक एम.के.रघुवंशी, साळूखे जळगावचे उल्हास पाटील, मोलगी वनक्षेत्रपाल व्ही.एस.गुरव, वनक्षेत्रपाल आर.जी.लामगे, पाटील -वनक्षेत्रपाल गस्ती पथक शहादा शिवाजी रत्नपारखे, वनपाल विजय तेले, वनरक्षक प्रकाश सोनार, नितीन पाटील,आबा न्याहाळदे जितेंद्र गिरासे, गस्ती पथक शहादा हे उपस्थित होते. दरम्यान हरित चिमटा कोणी लावला याबाबत संभ्रम असून कोणीही याबाबत माहिती देण्यास पुढे येत नसल्याने वनविभागासमोर चिमटा लावण्याचा शोध घेण्याचे आवाहन उभे राहिले आहे.
सदर बिबट हा साधारणतः ७ ते ८ वर्षाचा असून रेस्क्यू टीम येण्यापूर्वीच पथकाने बिबट्यास बेशुद्ध न करता पकडले. वनविभागाच्या वतीने ग्रामीण भागात वन्य प्राणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सदर बिबट्यास लवकरच अधिवासात सोडण्यात येणार आहे.
के.बी.भवर
उपवनसंरक्षक








