नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातून दोन ट्रकांमधून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांमधून ४३ जनावरांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मालेगाव येथील शेख जाकीर शेख रज्जाक हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.०४ ईबी ८०१४) व आसिफ बसरोद्दीन खान हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र.जी.जे.०१ जेटी १८७९) मधून जनावरांची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनूसार, पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास दोन्ही वाहने आले असता त्यांची तपासणी केल्यावर एका वाहनात १९ गोवंश तर दुसऱ्या वाहनात २४ म्हशी दाटीवाटीने बांधून वाहतूकीचा परवाना नसतांना क्रूरतेने व निर्दयतेने वाहतूक करतांना आढळून आले. याबाबत पोहेकॉ. दिलवर भील यांच्या फिर्यादीवरुन दोघा संशयितांविरोधात नंदुबार शहर पोलिस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (ड) सह मोटार वाहन अधिनियम कलम १९८८ चे कलम ६६ चे उल्लंघन १९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत.








