म्हसावद l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील सुलतानपुर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होऊनही वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पिंजरा लावत नसल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. लवकरात लवकर पिंजरा न बसविल्यास शेतकरी वनविभागाविरोधात उपोषणाच्या पवित्र्यात आहेत.
सुलतानपुर परिसरातील सुलतानपुर-खेतीया फाटा रस्ता लागत असलेल्या शेतात आलेल्या ठेलारीच्या मेंढपाळ च्या कळपावर बिबट्याने काही दिवसांपूर्वी हल्ल्या केला होता. त्यात २ मेंढी ठार झाल्या तर २जखमी झाल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे सुलतानपूर येथे प्राचीन काळीन किल्ला परिसरात शेळी वर हल्ला करीत जागीच पडसा पाडला.शेतात फेर फटका मारण्यासाठी डॉ.हर्षल पाटील,जगन्नाथ पवार, युवराज पवार गेले असता.युवराज शामराव पवार यांच्या शेतात बिबट्याने वासरूचा पडसा पाडल्याचे दिसून आले.
सुलतानपुर-सुलवाडे परिसरात केळी व उसाचे क्षेत्र अधिक आहे. या परिसरात लपण्यास जागा असल्याने बिबट्याचा वावरही आढळून येतो.या भागात बिबट्या आढळून येत असल्याने शेतकरी, ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून केवळ आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
वनविभागाला जाग कधी येणार?
शहादा तालुक्यातील सुलतानपुर परिसरात वनविभाग बिबट्याच्या हल्ल्यात ग्रामस्थांचे प्राण गेल्यानंतर जागे होणार का, असा संतप्त सवाल सुलतानपुर, सुलवाडे परिसरातील गावकऱ्यांनी केला आहे.
सुलतानपुर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतात शेत मजूर कामासाठी जाण्यास धजावत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित वनविभागाला बिबट्याचा वावर असल्याची माहिती देऊन देखील या भागात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला नाही तरी वनविभागाने मनुष्य हानी होऊ नये याची काळजी घेत त्वरित बिबट्याला जेरबंद करावे.
– डॉ.किशोर पाटील, किसान मोर्चा प्रदेश सदस्य भाजपा









