नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने सन -2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे . या वेळापत्रकानुसार एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या 2 जानेवारी 2022 ला होणार आहे . तसेच मुख्य परीक्षा ही 7 , 8 आणि 9 मे दरम्यान घेण्यात येणार आहेत . दरम्यान , या परीक्षांसाठी अर्ज करण्यासाठी आयोगाकडून ऑक्टोबर महिन्यात जाहीरात प्रसिद्ध केली होती .
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने आयोगाकडून जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार आयोगाची 2022 ची राज्यसेवा परीक्षा जून आणि ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे . 2021 वर्षाची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी , 2022 रोजी आणि मुख्य परीक्षा दिनांक 7 , 8 आणि 9 मे , 2022 रोजी होणार असून या परीक्षांचे निकाल हे ऑगस्ट 2022 मध्ये जाहीर केले जाणार आहेत . पोलीस उपनिरीक्षक • मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 16 एप्रिल 2022 ला होणार आहे . तसेच मुख्य परीक्षा 3 जुलैला होणार आहे . तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 तर मुख्य परीक्षा 9 जुलै ते 31 जुलैदरम्यान पार पडणार आहे .दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 12 मार्च रोजी तर मुख्य परीक्षा 2 जुलैला पार पडणार आहे . महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल तर मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान तसेच महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 30 एप्रिल आणि मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे . आयोगाकडून घेण्यात येणारी वर्ष 2022 साठी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 19 जूनला तर मुख्य परीक्षा 15 , 16 आणि 17 ऑक्टोबरला घेतली जाणार आहे . या सर्व परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक एमपीएससीच्या https : // mpsc .gov.in / या वेबसाईटवर उपलब्ध आहे . आयत्यावेळी परीक्षेच्या तारखांत होणाऱ्या बदलाविषयी वेबसाईटच्या माध्यमातून परीक्षार्थ्यांना कळविण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .