नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खोकसा ते वारसागावा दरम्यान असलेल्या जंगलात वाघाचे दर्शन झाल्याचे
प्रत्यक्षदर्शींनी दावा केला आहे.सदर परिसर गुजरात राज्याची हद्द आहे.
महाराष्ट्र गुजरात राज्य सीमाभाग असलेल्या नवापूर तालुक्यातील खोकसा आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वारसागावा दरम्यान असलेल्या जंगलात प्रत्यक्ष वाघाचे दर्शन असल्याचे नवापूर तालुक्यातील एकाने सांगितले. सदर परिसर गुजरात राज्याची हद्द असल्याने वाघ, सिंह तसेच इतर हिंस्र प्राण्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु प्रत्यक्षदर्शींना वाघाचे दर्शन झाले असले तरी वन विभागाचे अधिकारी व प्रशासन सदर प्राणी वाघ नसून बिबट्या असल्याचं सांगत आपली जबाबदारी झटकतात.नवापुर तालुक्यातील झामनझीरा येथील रहिवासी नुजा गावीत आपल्या मुलीला व जावयाला विंचूर येथे सोडण्यासाठी गेले असता तिकडून परत येताना खोकसा ते वारसा गावा दरम्यान जंगलात त्यांना प्रत्यक्ष वाघाचे दर्शन झाले. सदर प्राणी खरंच वाघ आहे की बिबट्या हे तपासण्यासाठी त्यांनी स्वतः वाहनाच्या हेडलाईटद्वारे पाहणी करून सदर प्राणी वाघ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धुळे आणि नंदुरबार जिल्हा हद्द असून हा परिसर संपूर्ण जंगलाने वेढलेला आहे तसेच हा घाट रस्ता असल्याने या रस्त्यावरून रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच वन विभागाने सदर प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.








